लहान मुलांमधील थायरॉईड समस्या म्हणजे काय?
थायरॉईड समस्या प्रौढांच्या मानाने लहान मुलांमध्ये जरी दुर्मिळ असली तरी अजिबातच नाही असे नसते. त्याची वैशिष्ट्ये आणि लक्षणे दोघांमध्ये साधारणतः सारखी असली तरी थोडाफार स्पष्ट असा फरक असतोच. थायरॉईडीजम (थाईरॉईड ग्रंथीचा आजार) हा कमी क्रियाशील थाईरॉईड ग्रंथी (हायपोथाईरॉईडीजम) किंवा अतिक्रियाशील (हायपरथायरॉईडीजम) थायरॉईड ग्रंथीमुळे होतो. थायरॉईड समस्येनुसार लक्षणे आणि उपचार वेगवेगळे असतात.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
लहान आणि किशोरवयीन मुलांमध्ये थायरॉईड समस्येचे मुख्यतः दोन प्रकार आढळून येतात. दोघांच्या चिन्ह आणि लक्षणांमध्ये बराच फरक आहे.
- हाशिमोटो थायरॉइडिटिस: या प्रकारात मुलांची वाढ खुंटते. गळ्याला गॉईटर मध्ये येते तशी सूज येते. त्वचेला कोरडेपणा आणि खाज येणे, अंगावर सूज येणे, वजन वाढणे, थंडी वाजणे, उत्साह, एकाग्रता कमी होणे, बद्धकोष्ठता ही काही उल्लेखनीय लक्षणे आहेत.
- ग्रेव्हज डिसीज: अतिउत्साह, अतिक्रियाशीलता, लक्ष विचलित असणे, उदासीनता, अति प्रमाणात वाढ, वागणुकीत तसेच झोपेबाबतीत बदल, नाडीचा वेग जलद होणे, वजनात घट होणे, स्नायू कमजोर होणे, वरचेवर अतिसार ही ह्या आजाराची विशेष लक्षणे आहेत.
याची प्रमुख कारणं काय आहेत?
थायरॉइडिजमची दोन प्रमुख कारणे, अक्रियाशील किंवा अतिक्रियाशील थायरॉईड ग्रंथी हीच असल्यामुळे त्यापासून होणाऱ्या त्रासाचे मूळही तिथेच आहे.
- शरीरातील रोगप्रतिकार संस्था जेंव्हा थाईरॉईड ग्रंथींवर हल्ला करून त्यांचे संप्रेरक (हार्मोन) उत्पादन बंद करतात तेंव्हा हाशिमोटो थायरॉईडीटीस हा आजार होतो. या प्रकारात शरीरावर होणारे परिणाम दिसायला बराच वेळ लागतो. अर्थातच निदान करणे तेंव्हाच शक्य होते जेंव्हा लक्षणे प्रकर्षाने दिसायला लागतात.
- ग्रेव्ह्ज डिसीज हा एक ऑटोइम्युन प्रकार आहे. या प्रकारात शरीरातील अँटीबॉडीज थायरॉईड ग्रंथींना उत्तेजित करतात त्याचा परिणाम म्हणून थाईरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात संप्रेरके उत्पादन करतात.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
थायरॉईड समस्येमध्ये प्रथम रक्तचाचणी केली जाते. त्यात थायरॉईड हार्मोन तसेच थायरॉईड उत्तेजक हार्मोनची पातळी तपासली जाते. रुग्णाची शारिरीक तपासणी तसेच अन्य तपासण्या केल्या जातात. ह्यामुळे थायरॉइडची लक्षणे समजण्यास मदत होते.
प्रत्येक अवस्थेसाठी उपचार वेगवेगळे असतात.
- हाशिमोटो थायरॉइडिटिस: हार्मोन्स पूर्णतः बदलली जातात. थायरॉइडच्या क्रियाशीलतेनुसार औषधाची मात्रा कमीजास्त ठेवली जाते ज्यामुळे हार्मोन्सची पातळी समतोल राखली जाऊ शकते.
- ग्रेव्ह्ज डिसीज: अँटीथायरॉईड औषधे लगेच दिली जातात. हार्मोन्सची पातळी आटोक्यात येईपर्यंत ती चालू ठेवली जातात. काही वेळेस मात्र शस्त्रक्रिया करून ग्रंथी काढून टाकणे हाच उपाय उरतो. संपूर्ण उपचारात थायरॉईडची पातळी आणि लक्षणे ह्यावर सतत लक्ष ठेवले जाते.