लिम्फोमा म्हणजे काय?
लिम्फोमा हा एक प्रकारचा कर्करोग आहे ज्यामध्ये पेशींचा नाश न होता त्यांत लिम्फोसाइट्सची अनियंत्रित वाढ होत जाते. यामुळे शरीरात अशा पेशींच्या संख्येत वाढ होते आणि त्यांचा संचयदेखील वाढतो.
लिम्फोमाची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
सुरुवातीच्या काळात लिम्फोमाची काही प्रारंभिक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे वरकरणी अतिशय सामान्य आरोग्यविषयक समस्या वाटू शकतात ज्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाण्याची दाट शक्यता असते. अशीच काही प्रारंभिक लक्षणे खाली नमूद केली आहेत:
- मान तसेच काखेतल्या लिम्फ नोड्सला सूज येणे.
- थकवा जाणवणे.
- अधून-मधून ताप येणे.
- रात्री खूप घाम येणे.
- वजनात खूप कमी होणे.
- भूक कमी होणे.
- केस गळणे.
दुर्लक्ष केले गेल्यास ही लक्षणे अधिक तीव्र होऊ शकतात. अशीच काही तीव्र स्वरूपाची लक्षणे खाली नमूद केली आहेत:
- हाडे दुखणे.
- श्वास घेण्यात अडचणी येणे.
- दीर्घकालीन अशक्तपणा आणि थकवा.
- वर नमूद केलेल्या लक्षणांच्या तीव्रतेमध्ये वाढ होणे.
लिम्फोमाची प्रमुख कारणे काय आहेत?
जेव्हा लिम्फोसाइट्स, म्हणजेच पांढऱ्या पेशी ज्या की रोगप्रतिकारक शक्तीसाठी जबाबदार असतात मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात तेव्हा त्यास लिम्फोमा असे म्हणतात.
लिम्फोसाइट्सच्या या अनियंत्रित वाढीमागचे निश्चित कारण अद्याप समजू शकले नसले, तरी ते शोधण्यासाठी अभ्यास केला जात आहे. वय आणि लिंग यांसारख्या काही घटकांना अजूनही या कर्करोगाचे प्रमुख जबाबदार घटक असल्याचे मानले जाते, परंतु हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
लिम्फोमा होण्यास कारणीभूत असलेल्या काही ज्ञात घटकांमध्ये लठ्ठपणा, ‘कार्सिनोजेन्स’, मद्यप्राशन, धूम्रपान, किरणोत्सर्ग (रेडिएशन) आणि तंबाखू-प्राशन इत्यादी घटकांचा समावेश होतो.
लिम्फोमाचे निदान व उपचार कसे केले जातात?
लिम्फोमाची लक्षणे आढळून आल्यास, डॉक्टर किंवा हेमॅटोपॅथॉलॉजिस्ट नेमक्या कोणत्या प्रकारच्या पेशींची अनियंत्रित वाढ होत आहे हे सुनिश्चित करण्यासाठी बायोप्सीचा सल्ला देतात.
लिम्फोमाबाधित पेशी सुनिश्चित झाल्यानंतर शरीरातील लिम्फोमा प्रभावित भाग शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे, रक्त चाचण्या, कॉम्प्युटेड टोमोग्राफी (सीटी) किंवा मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) इत्यादी चाचण्या केल्या जातात.
कर्करोग किती गंभीर आहे यावर उपचार अवलंबून असतो.
सुरुवातीच्या काळात लिम्फोमावर केवळ औषधांच्या साहाय्याने उपचार केले जातात; परंतु नंतरच्या काळात मात्र किमोथेरपी व रेडिएशनचा उपयोग करून उपचार केले जातात. अशावेळी, कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या 'बी-सेल्स'ना लक्ष्य करणाऱ्या रिच्युझिमाब सारख्या ड्रग्सचादेखील उपचारासाठी वापर केला जातो. काही विशिष्ट प्रकरणांमध्ये, जसे कि रोगप्रतिकारक शक्ती अतिशय कमी असल्यास, डॉक्टर 'बोन मॅरो' किंवा 'स्टेम-सेल ट्रान्सप्लांट' देखील करतात, ज्यामुळे निरोगी आणि रोगप्रतिकारक पेशी वाढण्यास मदत होते.