सारांश
वेळेवर लक्ष दिले नाही, तर हृदय विकाराचा झटका सामान्यपणे रुग्णासाठी जीवघेणी आणीबाणीची म्हणजेच तातडीची स्थिती निर्माण करतो, जी रुग्णाच्या कुटुंबीयांना व जवळच्या मित्रांसाठीही त्रासदायक व तणावकारक असते. अनेक लोकांना हृदय विकाराचा झटका या शब्दाचीच धास्ती असते. रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने त्याच्या हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा होण्यात अचानक बाधा येऊ शकते. हृदय विकाराच्या झटक्याचे मुख्य कारण असते धमन्यांच्या भिंतींवर आतून जमा झालेली चरबी. अशा चरबीला 'प्लाक' असे म्हणतात. धूम्रपान, पोषक नसलेला आहार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्टोरलची अधिक मात्रा, मद्य सेवन, बैठ्या कामाची जीवनशैली या सर्वांचा मिळून झालेला एकत्रित परिणाम हृदय विकाराच्या झटक्याला आमंत्रण देतो. ईसीजी आणि हृदयरोगाची लक्षणे हृदय विकाराच्या झटक्याचे निदान करू शकतात. तीव्र स्वरूपाच्या झटक्याचे उपचार रक्तवाहिनीद्वारे अँजिओप्लास्टी करून केले जातात तसेच पोटातून औषधे दिली जातात. आणि कधी कधी रुग्णावर बाय पास शस्त्रक्रिया करावी लागते.