लहान मुलांमध्ये डिप्रेशन (नैराश्य) काय आहे?
प्रौढांप्रमाणे, मुलांनाही डिप्रेशनचा (नैराश्याचा) त्रास होतो. खिन्नता, कशात लक्ष न लागणे परिणामी या सगळ्याचा शाळेच्या अभ्यासावर, नात्यांवर आणि इतर गोष्टींवर परिणाम होणे अशा लक्षणांनी मुलांमधील नैराश्य लक्षात येते. खिन्नतेच्या थोड्या काळापुरत्या झटक्यासारखे नैराश्य लवकर निघून जात नाही म्हणून त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज असते. मुलांमधील नैराश्याचा गंभीर विचार व्हायला हवा तसेच त्याच्यावर योग्य ते उपचारही व्हावेत.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
खालील लक्षणांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यास मुलास नैराश्याचा त्रास होत आहे अथवा नाही ते समजते:
- तापटपणा आणि पटकन राग येणे.
- भूक आणि झोपेच्या वेळापत्रकात बदल होणे.
- आत्महत्या करण्याकडे कल.
- एकाग्रता कमी होणे, ऊर्जा आणि इच्छाशक्तीचा अभाव.
- मधूनच रडणे, टीका आणि नकार सहन न होणे.
- सामाजिक सुसंवादापासून अलिप्तपणा.
- सतत खिन्न मनस्थिती, अपराधीपणाची किंवा निरर्थकतेची भावना मनात असणे.
- उपचारांनी बरी न होणारी डोकेदुखी आणि पोटदुखी.
याची मुख्य कारणं काय आहेत?
लहान मुलांमधील नैराश्याला बर्याच गोष्टी कारणीभूत असतात. त्या म्हणजे:
- नैराश्याचा कौटुंबिक इतिहास.
- दारू किंवा ड्रग्सचे व्यसन.
- कौटुंबिक भांडणे आणि ताणतणाव.
- शारीरिक आजार.
- तणाव वाढवणाऱ्या कौटुंबिक घटना.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
एखाद्या मुलामधे पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस खिन्नता दिसून येत असेल तर त्याला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. मानसोपचार तज्ञाकडे पाठवण्यापूर्वी डॉक्टर काही शारीरिक आजार आहे का हे तपासून बघतात. मुलाशी आणि त्याच्या कुटुंबाशी चर्चा, वैद्यकीय आणि कौटुंबिक इतिहास, मित्रपरिवार आणि शिक्षकांशी चर्चा, तसेच काही मनोवैद्यकीय प्रश्नावली इत्यादींच्या मदतीने नैराश्याचे निदान केले जाते. याचबरोबर इतर काही विकृती जसे की अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टीविटी डिसऑर्डर (ADHD) आणि ओब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) इत्यादीची सुद्धा तपासणी केली जाते.
नैराश्यावर उपचाराची पहिली पायरी म्हणजे मनोचिकित्सा ज्याच्यात काउन्सिलिंग आणि इतरही काही उपाय वापरले जातात. अँटीडिप्रेसंट्स हा तीव्र नैराश्यावर मात करण्यासाठी दुसरा पर्याय आहे. गरज भासल्यास नैराश्याबरोबर असणार्या इतर विकृतीसाठीही औषधे दिली जातात.