लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन काय आहे?
डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याच्या योग्य प्रमाणात कमतरता होणे. लहान मुलांमधे शरीरातील द्रव पदार्थाची पातळी फार लवकर कमी होते त्यामुळे डिहायड्रेशनची स्थिती होते. मुले त्यांच्या गोष्टींमधे इतकी रमतात की आपल्याला तहान लागते आहे किंवा डिहायड्रेशन होते आहे हे लक्षात येत नाही. खेळताना खूप घाम आल्यामुळे किंवा सतत लघवीला गेल्यामुळे सुद्धा डिहायड्रेशन होते.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?
मुलांमधील डिहायड्रेशनची साधारण चिन्हे आणि लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:
- मंद हालचाली किंवा सुस्ती.
- चिडचिड.
- लघवी कमी होणे.
- रडताना डोळ्यातून पाणी न येणे, डोळे कोरडे होणे.
- लहान बाळांच्या टाळूला खड्डा पडणे.
- डोळे खोल जाणे.
- तोंड कोरडे आणि चिकट होणे.
याची मुख्य कारणं काय आहेत?
अनेक घटकांमुळे मुलांमध्ये डिहायड्रेशन होऊ शकते. यापैकी काही अशी आहेत:
- उष्ण हवामानामुळे किंवा खेळताना खूप घाम येणे.
- उलटया, ताप आणि/ किंवा अतिसार.
- तोंडात येणार्या फोडांच्या वेदनेमुळे काहीही खाता-पिता न येणे.
- साल्मोनेलासारखा जीवाणू संसर्ग किंवा जियार्डियासीससारखा परजीवी संसर्ग होणे.
- सिस्टिक फायब्रोसिस किंवा सेलिआक रोग.
- सतत लघवीला जाणे : डायबेटिस मेलिटस, मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा किडनी स्टोनमुळे.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
मुलांच्या साधारण शारीरिक तपासणीवरून डिहायड्रेशनचे निदान होऊ शकते. पण तरी एखादा संसर्ग आहे का ते तपासण्यासाठी डॉक्टर्स रक्त चाचणी करून घेण्यास सुचवतात तसेच सतत लघवीला जावे लागत असल्यास रक्तातील साखर तपासण्याचाही सल्ला दिला जातो. डायबेटिस किंवा मूत्राशयाचा संसर्ग तपासण्यासाठी मुत्राचा नमूना घेतला जातो. छातीची एक्स-रे चाचणी, शौचाचे कल्चर किंवा रोटाव्हायरसची चाचणी ही करून घेण्यास सांगितली जाऊ शकते.
डिहायड्रेशनचा मुख्य उपचार म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवणे. नवजात बालकांच्या बाबतीत आईला त्यांची जास्त काळजी घ्यायला सांगितली जाते. डिहायड्रेशनच्या सौम्य प्रकारात घरीच तोंडावाटे द्रव पदार्थ घेण्यास सांगितले जाते तसेच स्वत:हून घेण्यासारखी काळजी जसे की ब्रॅट आहार (केळे, भात, सफरचंद आणि टोस्ट). द्रव पदार्थांचे सेवन जास्त करावे जसे की शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी, फळांचा रस, ताक आणि भरपूर पाणी. मुलाला द्रव पदार्थ थोड्या थोड्या वेळानी व हळूहळू पिण्यास द्यावेत.
मध्यम प्रकाराच्या डिहायड्रेशनमध्ये जेंव्हा शरीराचे 5 ते 10 टक्के वजन कमी झालेले असते तेंव्हा डॉक्टर्स शिरेतून (आयव्ही) द्रव पदार्थ देतात आणि मग जेंव्हा मूल तोंडावाटे द्रव पदार्थ घेण्यास सुरुवात करते तेंव्हा त्याला घरी पाठवले जाते. गंभीर प्रकारात जेंव्हा शरीराचे 15 टक्के वजन कमी होते तेंव्हा मुलाला निरीक्षणासाठी, शिरेतून आयव्ही देण्यासाठी तसेच पुढील तपासण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते.