बायपोलर विकार म्हणजे काय?
बायपोलर विकार ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे जिथे व्यक्तीचे मूड आत्यंतिक आनंदी आणि नैराश्य असे बदलत राहतात. याला मॅनिक डिप्रेशन असेही म्हणतात आणि त्याचा व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो.
याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहे?
ज्या मूडमध्ये व्यक्तीची ऊर्जा सर्वोच्च पातळीवर असते त्याला मॅनिया म्हणतात.
- या मूडमध्ये ते अतिरिक्त (वाजवीपेक्षा जास्त) आनंदी आणि सकारात्मक असतात, अतिउदार होऊन भेटवस्तू देणे किंवा अवास्तव खरेदी करणे यासारख्या गोष्टी खूप सहजपणे करतात.
- ते चिडचिडे असू शकतात आणि त्यांना भ्रम होऊ शकतात किंवा अस्तित्वात नसलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.
या मूडच्या अगदी विरुद्ध टोकाचा मूड म्हणजे नैराश्य ज्यामध्ये व्यक्ती दु:खी असते, खिन्न राहतो, त्याला कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही.
- नैराश्य हे क्लिनिकल डिप्रेशनसारखे असते, जिथे व्यक्तीला इतरांशी कोणताच संवाद साधण्याची इच्छा नसते किंवा नेहमीच्या कामकाजात रस वाटत नाही.
- त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ शकतात.
या दोन मूड दरम्यान, बायपोलर विकार असलेला रुग्णाची वागणूक सर्वसामान्य असू शकते. याचा काही ठराविक कालावधी सुद्धा नसतो, असे कधी एक आठवड्यासाठी टिकू शकते, कधी महिनाभर राहते.
बायपोलार विकारची मुख्य कारणे काय आहे?
बायपोलर विकाराचे कोणतेही ज्ञात कारण नाही आहे. भरपूर संशोधन सुरु असले तरी केवळ जोखीमीचे घटक ओळखता आले आहेत.
- मेंदूची रचना, ज्याच्या प्रभावाने ही परिस्थिती निर्माण होते ते, एक कारण मानले जाते.
- जर आईवडील किंवा आजीआजोबांना बायपोलर विकार असेल तर, मुलांना हा विकार जडण्याची शक्यता जास्त असते.
- आत्यंतिक मानसिक ताण, मानसिक आघात, अगदी शारीरिक आजार ही बायपोलर विकार होण्याची इतर करणे आहेत.
याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?
बायपोलर विकाराचे निदान करणे सोपे नाही कारण ते कोणतेही शारीरिक लक्षण दाखवत नाही तसेच मूड हा व्यक्तीगणिक वेगवेगळा असतो.
- एक मनोचिकित्सक निरनिराळ्या क्रिया आणि प्रक्रियांचा उपयोग करून व्यक्तीच्या मानसिक आरोग्याची चाचणी करतो. रुग्णाने आपल्या (बदलत्या) मूडची नोंदणी बाळगल्यास निदान करताना मदत होते.
- मनोवैज्ञानिक लक्षणांवर आधारित बायोपोलर विकाराची पुष्टी करण्यासाठी अनेक मानसिक आरोग्य चाचण्या उपलब्ध आहेत.
- इतर आजाराची शक्यता नाकारण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी तसेच काही रक्त चाचण्या करतात.
बायोपोलर विकारावरील उपचारामध्ये औषधोपचार, थेरपी आणि जीवनशैलीतील बदल याद्वारे मूड संयमित करणे याचा समावेश होतो.
- औषधोपचारामध्ये नैराश्यविरोधी आणि अँटी-सायकोटिक औषधांचा समावेश होतो.
- थेरपीमध्ये आंतर-वैयक्तिक (इंटर पर्सनल) थेरपीचा समावेश होतो ज्यामध्ये झोप आणि खाणे यासारख्या नियमित सवयींवर नियंत्रण मिळविण्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
- आकलन थेरपी या पद्धतीमध्ये मनोचिकित्सक रुग्णाच्या विचार प्रक्रियेत बदल घडवून त्याची/तिची वागणूक नियंत्रित करण्यासाठी रुग्णासोबत संवाद साधतो.
स्वत:ची काळजी घेण्यासाठी इतर उपायांमध्ये प्रिय व्यक्तींचे पाठबळ, दैनंदिन नित्यकर्म निश्चित असणे, बदलते मूड ओळखणे आणि त्यावर तज्ञांच्या मदतीने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करणे यांचा समावेश होतो.